
किर्लोस्कर मासिक जून १९८१
मराठा समाजाच्या गुणदोषांची केलेली चिकित्सा……….
‘सत्ता गेली हीच मराठा समाजाला सुवर्णसंधी’ हा डॉ. आ. ह. साळुंखे यांचा लेख ‘किर्लोस्कर’च्या जून १९८१ च्या अंकात प्रसिद्ध झाला, त्याला आता ३० वर्षे होऊन गेली आहेत. १९८१ पासून ते आजतागायत मराठ्यांच्या स्थितिगतीत पुष्कळ परिवर्तन झाले आहे. त्यानुसार या लेखाचा उत्तरार्ध लिहिण्याची आवश्यकता असल्याची जाणीव स्वतः लेखकाला आहे. परंतु कार्यव्यग्रतेमुळे ते लिहू शकले नाहीत. ह्या लेखात डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केलेली मते ही मराठा समाजाच्या तत्कालीन स्थितिगतीचा वेध घेणारी आहेत, हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे.
_संपादकस्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेली पंचवीस-तीस वर्षे महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणात मराठा जात आघाडीवर होती. अगदी अलीकडे या क्षेत्रातून तिची पिछेहाट झाली आहे, असे म्हणतात. मी स्वतः तथाकथित मराठा जातीमध्ये जन्माला आलेलो असूनही या घटनेमुळे मला अत्यंत आनंद झाला आहे. मी या घटनेचे मनापासून स्वागत करीत आहे. कारण गेली कित्येक वर्षे अशी घटना घडावी म्हणून मी वाट पाहत होतो. मराठ्यांच्या हातातील राजकीय सत्ता त्यांच्याच हितासाठी कोणी तरी हिसकावून घ्यावी, असे मला मनोमन वाटत होते. कोणाला माझ्या या विचारांचे आश्चर्य वाटेल, कोणाला चीड येईल; परंतु माझ्या या विचारांना काही पार्श्वभूमी आहे, हे मी स्पष्ट करू इच्छितो. या पार्श्वभूमीचा उलगडा व्हावा, म्हणून मराठ्यांच्या सद्यःस्थितीचे एक समाजशास्त्रीय विश्लेषण मी येथे मांडत आहे. दुसऱ्या कोणाविषयी वाटणाऱ्या द्वेषातून वा आकसातून हे विश्लेषण केलेले नाही. एका परीने हे आरशात पडलेल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाचे विश्लेषण आहे. आत्मोद्धारासाठी केलेले एक आत्मनिरीक्षण आहे. अनेकांच्या मनात खदखदत असलेल्या भावनांना वाट करून द्यावी आणि या विषयावरील एका चर्चेला फक्त प्रारंभ करावा, एवढ्या मर्यादित हेतुने मी हा लेख लिहीत आहे. येथे मांडलेले विश्लेषण म्हणजे या विषयाची सर्वांगीण व समग्र चर्चा नव्हे. तसेच, हे विश्लेषण ज्यांना लागू पडत नाही, अशा अपवादभूत व्यक्ती अल्प प्रमाणात का होईना, मराठा समाजात आहेत, याचा निर्देशही मी प्रारंभीच करून ठेवतो.
१)सरंजामशाही प्रवृत्तीचा प्रभाव:
मराठा जातीचे बहुसंख्य लोक अजूनही मध्ययुगीन सरंजामशाहीच्या कोशातच बंदिस्त आहेत आणि हेच त्यांचे मूलभूत दुखणे आहे, असे मला वाटते. पाण्याच्या प्रवाहातून वाहता वाहता एखादा अवाढव्य ओंडका कोठे तरी अडकून पडावा आणि मग स्वतः गतिहीन झालेल्या त्या ओंडक्याने इतरांचीही वाट अडवून टाकावी, तसेच काहीसे मराठ्यांचे झाले आहे. आज मराठा जातीमध्ये सरंजामशाहीचे अवशेष जितक्या प्रमाणात आढळून येतात, तितक्या प्रमाणात ते बहुधा महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्याही जातीमध्ये आढळत नाहीत. या सरंजामशाही वृत्तीतच त्यांच्या सर्व क्षेत्रांतील अवनतीची व दुर्दशेची बीजे आहेत. सत्तेची हाव, राजकारणाचे अतिरेकी प्रेम, विरोधकांविषयीची असहिष्णुता, शिक्षणाची हेळसांड, जमिनीसाठी होणारी भाऊबंदकी, स्त्रियांचा कोंडमारा करण्याची प्रवृत्ती, इतर जातीच्या लोकांना दुय्यम लेखून त्यांचा अपमान करण्याची अरेरावी प्रवृत्ती, कुळीचा दुरभिमान इ. दोष त्यांच्या सरंजामशाही वृत्तीतूनच निर्माण झाले आहेत.
आधुनिक युगाचा जणू काही त्यांना अजून स्पर्शच झालेला नाही. विसाव्या शतकाचे त्यांना अजून दर्शनच झालेले नाही. आधुनिकतेची काही बाह्य चिन्हे त्यांनी जरूर धारण केली आहेत, परंतु त्यांच्या अंतर्यामीच्या गाभ्यात मात्र अजूनही बुरसटलेल्या मूल्यांनीच ठाण मांडलेले आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने नव्या युगाची निर्मिती करणे दूरच, इतरांनी निर्माण करून आपल्या दाराशी आणलेल्या आणि आधुनिक मानवाला अत्यावश्यक असलेल्या नव्या मूल्यांचा केवळ स्वीकार करण्याइतकेदेखील ते जागे झालेले नाहीत. लोकशाही, विचारस्वातंत्र्य, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास, स्त्रीपुरुष समानता, मानवतावाद, विज्ञाननिष्ठा इ. मूल्यांच्या अधिष्ठानावर एक नवी संस्कृती उभारावी आणि मानवी जीवन अधिक समृद्ध करावे, असा आधुनिक मानवाचा प्रयत्न आहे. जगातील वेगवेगळे मानवसमूह कमीजास्त प्रमाणात त्या दिशेने अखंड वाटचाल करीत आहेत. परंतु मराठा जातीतील लोकांना मात्र अजूनही या मूल्यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने पटलेलेही नाही आणि समजलेलेही नाही. स्त्रीच्या डोक्यावरचा पदर थोडासा बाजूला सरकला, तर जणू काही आपल्या घराण्याचा सर्वनाश होतो, असे मानण्याच्या युगातच अजून ते जगत आहेत. नव्या मूल्यांच्या आधारे उत्थानाच्या प्रेरणा देणारे नेतृत्व त्यांच्यामध्ये अपवादानेच आहे
सर्वांगीण विकासाची स्फूर्ती देणारी एखादी व्यापक अशी सामाजिक व सांस्कृतिक चळवळ त्यांच्यामध्ये जवळजवळ अस्तित्वातच नाही. त्यांच्यामध्ये नवी स्वप्ने नाहीत की, नव्या आकांक्षा नाहीत. नवी स्पंदने नाहीत की, नव्या ऊर्मी नाहीत. जूनी मूल्ये टाकण्याचा विवेक नाही, की नवी निर्मिती करण्याची आच नाही. आहे केवळ सरंजामशाहीने दिलेली चाकोरी आणि तिनेच दिलेली अनंत दोषांची एक विषारी मालिका.
थोडेसे अधिकाराचे पद मिळाले की, आपण कोणी तरी सरदार आहोत, अशा थाटात मराठे वावरतात, याचे कारणही त्यांची सरंजामशाही वृत्तीच होय. आपण इतरांवर अधिकार गाजवला पाहिजे, आपल्या अवतीभवती खुशामतखोरांचे कोंडाळे असले पाहिजे, कोणीही आपल्याला विरोध करता कामा नये इत्यादी प्रकारचे विचार जणू काही त्यांच्या रक्तातच भिनलेले असतात. ‘आम्ही विद्वानांना विकत घेऊ’, ‘विरोध करणारांकडे पाहून घेऊ’, यांसारखी बेताल वक्तव्येदेखील याच प्रवृत्तीतून केली जातात. या सरंजामशाहीची दुसरीही एक बाजू आहे. आपल्याकडे अधिकार नसेल आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आपल्यावर आली असेल, तर त्या अधिकाऱ्याची वा पुढाऱ्याची हुजरेगिरी करून सत्तेला चिकटून राहणे, ही ती प्रवृत्ती होय. आपण स्वतः दारिद्र्यात पिचत असतानाही, आपले शोषण करून श्रीमंत व बलाढ्य होणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करणे, ही विभूतिपूजेची वृत्तीदेखील सरंजामशाही युगाचाच अवशेष आहे.प्रस्तुत लेखात सरंजामशाही वृत्तीमुळे निर्माण झालेल्या दोषांपैकी काही मोजक्या दोषांचे विवेचन करावयाचे आहे. मराठ्यांच्या दृष्टीने सध्या राजकारण हाच त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू असल्यामुळे त्याचेच विवेचन पहिल्यांदा करणे, हे इष्ट ठरेल. राजकारणामुळे मराठ्यांनी जितके कमावले, त्यापेक्षा किती तरी अधिक गमावले, असे या बाबतीत मला वाटते. माझे हे मत अनेक जणांना आक्षेपार्ह वाटेल. कारण सत्तेच्या आधाराने मराठ्यांनी भरपूर कमावले आहे, हे डोळे उघडे ठेवून पाहणाऱ्या कोणालाही दिसू शकेल. राजकीय सत्ता ही मराठ्यांच्या दृष्टीने दुधाळ कामधेनू वा फळाफुलांनी बहरलेली कल्पलताच ठरली आहे, असे कोणी म्हणतील. या सत्तेमुळे त्यांनी अधिकार आणि नोकऱ्या मिळवल्या; पैसा आणि पदव्या मिळवल्या; कित्येक भावी पिढ्यांना आर्थिकदृष्ट्या ददात भासणार नाही, अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली. एकंदरीत त्यांनी खूप खूप कमावले आणि फक्त कमावलेच. त्यांनी काहीही गमावले नाही, असे या आक्षेपकांना वाटेल.
कुबड्या मिळाल्या म्हणून
मराठ्यांनी हे सर्व कमावले. हे मलाही स्पष्टपणे दिसत आहे; परंतु त्यांनी कमावलेल्या आणि गमावलेल्या गोष्टींची तुलनाही करता येणार नाही, इतका त्यांचा हा व्यवहार आतबट्ट्यातील आहे, असे मला वाटते. कुबड्या फुकट मिळतात म्हणून एखाद्याने आपले पाय अधू करून घ्यावेत, तसाच हा व्यवहार आहे. त्यांनी सत्ता कमावली, परंतु आपण सत्तेच्या अभावीही जगू शकतो, हा आत्मविश्वासच गमावला. किंबहुना स्वतःच्या कर्तृत्वाने उभारलेले आणि खऱ्या अर्थाने स्वतःचे म्हणता येईल, असे जीवन जगण्याची कुवतच गमावली.
माझ्या मते राजकीय सत्तेमुळे मराठ्यांना पलायनाचा एक अत्यंत मोहक, परंतु तितकाच घातक मार्ग मिळाला. माझा मेहुणा आमदार असेल, तर त्याच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने मला चांगली नोकरी मिळू शकते, मग रात्रंदिवस अभ्यास करून शिकण्याची मला काय आवश्यकता, असे मराठा तरुणाला वाटते. परीक्षेच्या वेळी माझा अमुकतमुक नातेवाईक पर्यवेक्षक असेल आणि मला कॉपी करण्याची संधी सहजपणे मिळत असेल, तर मी पुस्तके वाचण्याचे कष्ट का घ्यावेत, असा त्याचा पिंड तयार झाला आहे.
पदवी मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेच पाहिजेत, नोकरी मिळवण्यासाठी उत्तम दर्जाची गुणवत्ता प्राप्त केलीच पाहिजे आणि ती टिकवण्यासाठी कार्यक्षमता दाखवलीच पाहिजे, अशी स्थिती असती, तर मराठा तरुणाने कष्ट केले असते, गुणवत्ता प्राप्त केली असती आणि कार्यक्षमताही दाखवली असती. प्रत्येक ठिकाणी त्याला जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले असते, तर त्याने त्या स्पर्धेत उतरण्याची तयारी केली असती आणि अनेकदा तो त्या स्पर्धेत यशस्वीही झाला असता. अगदी माझ्या मुलालाही वशिल्याने नोकरी लावणार नाही, अशी शपथ मराठा पुढाऱ्यांनी घेतली असती आणि ती पाळली असती, तर आज मराठा तरुण समाजाच्या विविध क्षेत्रांतून ताठ मानेने वावरताना दिसला असता, अभिमानाने जगताना दिसला असता; त्याला स्वतःचे पाय मिळाले असते, स्वतःचे पंख फुटले असते.
माझे जीवन म्हणजे कोणाच्या तरी मेहेरबानीने मिळालेली उष्टी पत्रावळ नाही, तर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने फुलवलेले ते एक मधुर नंदनवन आहे, अशी सुखद प्रचीती त्याला आली असती. आज मात्र त्याला नोकरी मिळवण्यासाठी कोणा तरी मुर्दाडाचे उंबरठे झिजवावे लागतात. मिळालेली नोकरी टिकवण्यासाठी आणखी तशाच कोणाची तरी थुंकी झेलावी लागते. कोणाची लाचारी पत्करावी लागते, तर कोणाची हुजरेगिरी करावी लागते. त्याला एक उष्टे वा उसने जीवन जगावे लागते आणि हे सगळे करावे लागते स्वतःच्या मनगटात ताकद आणि अंगात धमक असूनही. म्हणूनच आता कोणी तरी असे सांगण्याची वेळ आली आहे की, ‘बाबा रे, तुझे हे मनगट कर्तबगारी गाजवण्यासाठी आहे, लाचारीने कोणाला मुजरा करण्यासाठी नाही. तुझी ही वाणी स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी आहे, दुसऱ्या कोणाची भाटगिरी करण्यासाठी नाही.’
समोर आव्हान ठेवण्याची गरज
तानाजी मरून पडल्यावर मावळे पळू लागले, हा प्रसंग मला येथे आठवतो. पळून जाण्यासाठी उपयोगी पडणारे दोर सूर्याजीने कापून टाकले होते. ‘तुमचा बाप येथे मरून पडला आहे,’ असे त्यांना सुनावले होते. आता पळून जाताना कड्यावरून उड्या टाकून मरा किंवा येथे लढत लढत मरा, असा पर्याय त्यांच्यापुढे ठेवला होता. असे आव्हान समोर ठाकल्याबरोबर मावळे जिवावर उदार होऊन लढले आणि त्यांनी कोंढाणा जिंकला. मराठ्यांच्या पुढाऱ्यांनीही तरुणांपुढे असे काही आव्हान ठेवले असते, तर आज हे तरुण कोटी कोटी सूर्याच्या पर्याच्या प्रथेने तळपताना दिसले असते. त्यांनी नवी नवी आव्हाने पेलली असती, पचवली असती. संकटे पाहून त्यांचे रक्त सळसळले असते. परंतु आज मात्र ते खचलेले आहेत, दिशाहीन आहेत. त्यांच्या मनात आत्मविश्वास नाही. न्यूनगंडाने पछाडलेले आपले जीवन कोणाच्या तरी आश्रयाने एखाद्या बांडगुळाप्रमाणे टिकवून ठेवावे, हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांना जे स्वतःच्या कर्तृत्वाने मिळाले असते, त्यासाठी ते लाचार होत आहेत. आयुष्यभर कोणाच्या तरी उपकाराचे ओझे वाहत आहेत. एखादी गोष्ट स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवून भोगण्यात काय आनंद असतो, याचा त्यांना अनुभवच नाही. आपल्या कर्तृत्वाने मिळू शकणारे पंचपक्वानांचे ताट नाकारून कोणाच्या तरी मेहेरबानीने मिळणारी उष्टी पत्रावळ चाटणाऱ्या लोकांनी कमावले अधिक की गमावले अधिक ?
नवनिर्मिती कोणती?
केवळ राजकारणाचा ध्यास घेतल्यामुळे मराठ्यांची आणखीही एक फार मोठी हानी झाली आहे. मानवी जीवनाची इतर काही अंगे असतात, संस्कृतीची इतर काही दालने असतात, याचे त्यांना भानच उरलेले नाही. ऊठसूठ राजकारण. इकडेतिकडे राजकारण. साहित्य, संगीत, इतर कला, विज्ञान, लष्कर, समाजसेवा, क्रीडा इ. क्षेत्रांतून मराठा व्यक्ती अपवादानेच चमकताना आढळतात. नवनिर्मिती, संशोधन इत्यादी मार्गांनी या क्षेत्रांत आपली स्वतःची म्हणून काही भर घालावी, असे त्यांना वाटतच नाही. एखाद्या क्षेत्रात नवनिर्मिती केल्यामुळे मिळणाऱ्या अलौकिक आनंदाची त्यांनी चवच चाखलेली नाही. ही क्षेत्रे आपल्यासाठी नाहीत, ती एका विशिष्ट जातीसाठीच आहेत, असे त्यांनी गृहीत धरलेले आहे. एखादा मानवसमूह जेव्हा वर सांगितलेल्या विविध क्षेत्रांतून समतोल असा विकास साधतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. मराठ्यांनी मात्र या सर्व क्षेत्रांची बहुतांशी उपेक्षाच केलेली असून केवळ राजकारणाचाच मार्ग पत्करलेला आहे. म्हणूनच राजकारणातील त्यांच्या वर्चस्वाचे 1 मूल्यमापन करावयाचे झाले, तर ती एक सूज आहे, बाळसे नव्हे, असे म्हणावे लागेल; कारण बाकीचे सर्व अवयव क्षीण झालेले असताना एकच अवयव
सत्ता गेली हीच मराठा समाजाला सुवर्णसंधी । ६३ ।
मोठा होणे, हे रोगाचेच लक्षण असते, आरोग्याचे नव्हे ! एखाद्या झाडाची एकच फांदी शिल्लक ठेवून बाकीच्या सर्व फांद्या छाटून टाकल्या, तर त्याला अवकळा प्राप्त होते. ती एकच फांदी कितीही फोफावली, तरी त्या झाडाला डेरेदार वृक्षाची भव्यता व पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. मराठा जातीची अवस्थाही राजकारणाच्या अतिरेकी ध्यासामुळे अशीच एकारलेली व एकांगी झालेली आहे. सांस्कृतिक समृद्धीच्या दृष्टीने इतर क्षेत्रांचे महत्त्व कळत नसल्यामुळेच एखादा सरपंच शाळेत जाऊन शिक्षकाला चपलेने मारताना आढळतो. आपला मुलगा क्रीडापटू वा वैज्ञानिक होण्यापेक्षाही तो आमदार वा फौजदार व्हावा, असे लोकांना वाटते, तेही त्यामुळेच. सरपंच, आमदार, फौजदार इ. व्यक्तींचीही समाजाला आवश्यकता असते, हे मी नाकारीत नाही. परंतु आमदार वगैरे झाल्यामुळे जी सत्ता मिळते, त्या सत्तेच्या बाहेर काही विश्वच नाही, अशी त्यांची समजूत झालेली असून तीच त्यांच्या सर्वांगीण विकासाला बाधक आहे. आपल्या घरातून कालिदास वा शेक्सपिअर यांच्यासारखे महान साहित्यिक निर्माण व्हावेत; न्यूटन, आइन्स्टाइन यांच्यासारखे वैज्ञानिक निर्माण व्हावेत; फुले-आंबेडकर यांच्यासारखे समाजसुधारक निर्माण व्हावेत, अशी स्वप्ने पाहिली जात नाहीत आणि त्या दिशेने प्रयत्नही केले जात नाहीत. स्वप्ने पाहिली जातात, ती राजकीय सत्तास्थाने प्राप्त करण्याची, आटापिटा केला जातो, तो निवडणुका जिंकण्याचा. मराठा समाजाने आमदारापेक्षा साहित्यिकाला, मंत्र्यापेक्षा वैज्ञानिकाला, खासदारापेक्षा एखाद्या कलावंताला अधिक वा किमान बरोबरीचा मान दिला असता, तर मराठा समाजातील युवक व युवती राजकारणाऐवजी इतर क्षेत्रांकडे आकृष्ट झाल्या असत्या. परंतु मराठा समाजाने मूल्यांची अशी काही मांडणीच केलेली नाही.
सत्तेचे याचक
राजकारणाच्या हव्यासामुळे मराठ्यांची आणखीही एक हानी होते आहे. उमेद व उत्साह असलेली अनेक माणसे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत गेली असती, तर त्या सर्वांना नवनिर्मितीसाठी संधी मिळाली असती. त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला असता. परंतु बहुसंख्य लोक राजकारणाच्याच क्षेत्रात घुसल्यामुळे तेथे त्यांची नको इतकी गर्दी होते. मग एकाच ठिकाणी गर्दी केलेले याचक ज्याप्रमाणे आपापसातच भांडतात, त्याप्रमाणे हे लोक आपापसातच भांडत राहतात. एकमेकांच्या सामर्थ्याचे व प्रतिभेचे खच्चीकरण करतात. त्यांना एकमेकांना मागे रेटण्याचा खेळ खेळावा लागतो. मत्सर, हेवेदावे यातच त्यांची खूपशी शक्ती खर्ची पडते. त्यामुळे कोणत्याही विधायक कार्याकडे लक्ष द्यावयास त्यांना वेळच मिळत नाही.
राजकारणी स्वभावामुळेच विविध क्षेत्रांतून मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या बहुसंख्य संस्थांमध्ये अत्यंत घृणास्पद अशी गटबाजी चालीच्या जव्या हातात सत्ता आलेली
मराठा समाज । ६४ ।
असते, त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेमुळे या गटबाजीला खतपाणी घातले जाते. विशिष्ट लोक वेळी-अवेळी आपल्या उपयोगी पडतील, आपल्यावर काही संकट आले, तर आपण त्यांच्या आधारे त्यातून पार पडू शकू, आपल्या सत्तेला आव्हान देणाऱ्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला सांगण्यासाठी त्यांचा हेर म्हणून उपयोग होईल, यांसारखे विचार या गटबाजीमागे असतात. संस्था म्हणजे नवनिर्मितीचे एक साधन आहे, तिच्याशी आपले रक्ताचे नाते आहे आणि जगातील कोणतीही शक्ती हे नाते तोडू शकत नाही, अशी या संस्थाप्रमुखांची भूमिका असत नाही. संस्था म्हणजे संस्थेमुळे मिळणारे अधिकार, असे त्यांचे समीकरण असते. त्यामुळेच कोणी तरी आपल्याविरुद्ध कट करीत आहे, कोणी तरी आपले अधिकार हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे, अशा एका गंडाने या सत्ताधाऱ्यांना पछाडलेले असते. सदैव अशी धास्ती वाटत असल्यामुळे ते आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याभोवती आपला एक गट उभा करतात. आपल्याला शिरजोर होणार नाहीत, असे भेकड व खुजे लोकच या गटात असावेत, याची खबरदारी घेतली जाते. स्वाभिमानी, कर्तबगार व कार्यक्षम लोकांना येथे स्थान नसतेच. आपल्या गटातील निःसत्त्व लोक संकटप्रसंगी आपले संरक्षण करतील, अशी अपेक्षा तरी कशी बाळगली जाते, कोणास ठाऊक! वस्तुतः खरी सुरक्षितता मिळते, ती आपल्या अंतःकरणात असलेल्या दृढ आत्मविश्वासामुळे. तो ज्यांच्याजवळ नसतो, ते कचखाऊ, संशयी व न्यूनगंडाने पछाडलेले लोक गटबाजीच्या आधारे उपरी सुरक्षितता मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या गटातील लोक म्हणजे कोणी तानाजी वा बाजी प्रभू नसतात. ‘असतील शिते, तर जमतील भुते,’ या न्यायाने जमलेली ही एक भुतावळ असते. या भुतावळीचे वेगळे हितसंबंध असतात. आपण त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरलो, तर स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी ते आपल्यावर निश्चितच उलटतात. सुरक्षितता मिळावी म्हणून पोसलेली ही बांडगुळे आपल्यावरचा बोजा ठरतात, आपल्या गळ्यातील धोंड ठरतात. ही बांडगुळे सद्गुणी व कर्तबगार संस्थाप्रमुखांनाही अधःपतित करतात. परंतु लोकांना याची जाणीव होते, तेव्हा ‘बैल गेला नि झोपा केला,’ अशी स्थिती झालेली असते.
सन्मानाची पदे खुजी
सध्या राजसत्तेच्या आधारे आपल्याला मोठमोठी पदे मिळत आहेत. परंतु त्या पदांची जबाबदारी पेलण्याइतके कर्तृत्व आपल्याकडे नसल्यामुळे आपण त्या पदाची शान घालवीत आहोत, असे अनेकदा आढळते. वस्तुतः आपले कर्तृत्व असे हवे की, त्याच्यामुळे आपल्या पदाची ख्याती व प्रतिष्ठा वाढावी. सध्या मात्र आपण पदांमुळे प्रतिष्ठा प्राप्त करीत आहोत, परंतु आपल्यामुळे पदांची प्रतिष्ठा जात आहे. ग्रीक कथेतील एक राजा ज्या वस्तूला स्पर्श करी, त्या वस्तूचे सोन्यात रूपांतर होत असे. आपल्यालाही जणू काही त्या राजाची किमया प्राप्त झाली आहे. फरक एवढाच की, आपल्या स्पर्शाने पदांचे वा पदव्यांचे सोने होत नाही, तर कोळसा होत आहे.
शोषकांशी हातमिळवणी
ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्यांच्याशी आपण बांधीलकी मानलेली नाही. त्यांच्या हितसंबंधांना छेद देणारे असे आपले स्वतःचे हितसंबंध आपण निर्माण केले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांचे शोषण करणाऱ्या लोकांशी आपण हातमिळवणी केलेली आहे. पण हे आत्मघातकीपणाचेच आहे, असे मला वाटते. जेव्हा एखादी पिढी अविवेकी व स्वार्थांध होऊन समाजाला लुबाडते, तेव्हा ती आपल्याच भावी पिढ्यांच्या हितसंबंधांवर निखारे ठेवीत असते, असा इतिहासाचा दाखला आहे; कारण समाजाला लुबाडण्याची प्रक्रिया कदाचित दीर्घ काळही चालेल, परंतु ती कायमची मात्र चालू शकत नाही. लुबाडले जाणारे लोक केव्हा ना केव्हा बंड करतातच आणि मग ज्यांनी समाजाला लुबाडून सुख भोगलेले असते, त्यांच्या मुलाबाळांना आपल्या पूर्वजांच्या पापांचा जाब द्यावा लागतो. कित्येकदा ते सूडाच्या आगीमध्ये होरपळून निघतात. म्हणूनच निदान स्वतःच्या मुलाबाळांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तरी आपण चालवलेले बेताल शोषण थांबवले पाहिजे.
राजकारण हाही मानवी संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे मी नाकारत नाही. कित्येकदा तर राजकारणामुळेच समाजाचे स्वातंत्र्य व अस्तित्व अबाधित राहत असते. त्यामुळे राजकारणाची उपेक्षा करावी वा ते क्षेत्र कोणी वर्ज्य मानावे, असे मला मुळीच वाटत नाही. उलट राजकारण ही विजेसारखी एक ऊर्जा आहे. एक शक्ती आहे. तिचा नवनिर्मितीसाठी, विधायक कार्यासाठी व समाजाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी उपयोग करता येतो. परंतु राजकारण हा जीवनाचा फक्त एक घटक आहे, तो एकमेव घटक नव्हे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच राजकीय सत्तेमुळे कोणत्याही क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा परवाना आपल्याला मिळाला, असे कोणी समजू नये.
प्रत्यक्षात मात्र जेथे हस्तक्षेप करण्याचे साहस एखादा महापुरुषही करणार नाही, तेथे एखादा चारित्र्यहीन पुढारीही हस्तक्षेप करताना आढळतो. शिवाय प्रत्यक्ष राजकारणाचीही काही मूल्ये असतात, हेच आपण विसरून गेलो आहोत. उदाहरणार्थ, विचार-परिवर्तनानंतर पक्षांतर करणे हे राजकारणात गैर नाही. परंतु एकदा विचारपूर्वक एखाद्या पक्षाचा स्वीकार केल्यानंतर केवळ सत्तेच्या लालसेने पक्षांतर करणे हे सर्वथैव गैर आहे. अलीकडच्या काळात मराठा जातीतील लोकांनी सत्तेसाठी जितकी पक्षांतरे केली, तितकी बहुधा दुसऱ्या कोणीच केली नाहीत. बाजी प्रभू वा तानाजी यांनी सत्तेच्या लोभाने अशी पक्षांतरे केली असती, तर काय झाले असते ?
मराठा समाज । ६६ ।
राजकारणात संकटे आली की, इतिहास घडवण्याची संधीही येत असते. अशा वेळी ती संधी लाथाडावयाची आणि खुर्चीसाठी जीव टाकावयाचा, हे राजकारण नव्हे; हा तर पळपुटेपणा झाला. समोर ठाकलेली संकटे छातीवर झेलण्यात पुरुषार्थ असतो, पळून जाण्यात नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते, प्रवाहपतित होण्यात नाही. मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे, असे मी म्हणत नाही. पण प्रसंग आला, तर तसे जाण्यातच बाणेदारपणा असतो. जे आव्हानाला सामोरे जातात, त्यांच्या वाट्याला कधीकधी दुःख येते; परंतु त्यांच्याकडूनच इतिहास घडतो. जे आव्हान पेलू इच्छीत नाहीत, ते कदाचित सुखात लोळतीलही; परंतु ते कधी महापुरुष म्हणून गणले जात नाहीत. म्हणूनच सदा न् कदा मिशीवर पीळ देणाऱ्या मराठा जातीने राजकारणात एखाद्या पर्वताप्रमाणे स्थिर व खंबीर राहून आव्हाने झेलावीत, असे मला वाटते.
शिवाजी : भाबडी अस्मिता
अशी आव्हाने झेलणारा एक महापुरुष शिवाजीच्या रूपाने मराठा जातीमध्ये जन्माला आला होता. परंतु आता शिवाजी हे मराठ्यांचे स्फूर्तिस्थान उरले नसून ते एक मर्मस्थान बनले आहे. आता हे खरे आहे की, एवढ्या चतुरस्र प्रतिभेचा व उत्तुंग कर्तृत्वाचा महापुरुष कोणत्याही समाजात निर्माण झाला असता, तरी त्या समाजाने त्याचा अभिमानच बाळगला असता. परंतु अभिमान बाळगणे वेगळे आणि बाजार वा प्रदर्शन मांडणे वेगळे. येथे तर स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी शिवाजीच्या नावाची विक्री केली जात आहे. शिवाजीचे नाव घेण्यामुळे नव्हे, तर त्याच्यासारखे वागण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्याबद्दलचा अभिमान सार्थ राहणार आहे. पण येथे स्थिती अशी आहे की, शिवाजीचे नाव घेऊन कोणी आपल्या पार्श्वभागावर दोन लाथा हाणल्या, तरी आपल्याला त्याचे कौतुक वाटते. हा भाबडेपणाचा कळस झाला.
शिवाजीचा इतिहास लिहायला कोणी पोतदार वा खरे लागतात; कोणी साळुंखे वा जाधव पुढे येत नाहीत. शिवाजीच्या किल्ल्यांची भ्रमणे कोणी पुरंदरे वा कोणी दांडेकर करतात; कोणी गायकवाड वा सावंत त्या मार्गाने गेल्याचे ऐकावयास मिळत नाही. शिवाजीच्या नावाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यावयाचा, परंतु दुसऱ्या जातीच्या कोणी शिवाजीच्या कार्याचे काही नवे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘बघून घेतो’च्या संस्कृतीचा हिसका दाखवावयाचा. मी तरी या वागण्याला ‘शिवाजीवरचे प्रेम’ असे नाव देणार नाही. समजा, एखाद्याने शिवाजीविषयी काही वेगळ्या दृष्टिकोनातून मूल्यमापन केले, तर त्याच्या या लेखनामुळे काही लगेच आकाश कोसळणार नाही. आपण समर्थ युक्तिवादांच्या व प्रबळ पुराव्यांच्या आधारे त्याचे मत खोडून काढण्याचा मार्ग पत्करावा, हेच श्रेयस्कर. एखाद्याजवळ बावन्नकशी शुद्ध सोने असेल आणि दुसऱ्या कोणी ते सोने अयोटीवर कसून पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्याने हवालदिल वा संतप्त होण्याची काय आवश्यकता? कोणी विरोधी मत मांडतो, कोणी आपल्या सिद्धान्ताला आव्हान देतो वा चॅलेंज करतो, तेव्हा राग येण्याऐवजी आपल्याला आनंद झाला पाहिजे. त्याच्या आव्हानामुळे आपले अंग अंग रोमांचित व्हावयास हवे. आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये उत्साहाचे उधाण यावयास हवे. विरोधकाइतका महान मित्र असत नाही, उपकारकर्ता असत नाही, असे मानावयास हवे. त्याच्या विरोधामुळेच तर आपण खऱ्या अर्थाने जिवंत राहतो. आपली मरगळ नाहीशी होते.
अहो, अफझलखान नसता, शायिस्ताखान नसता आणि औरंगजेबही नसता, तर शिवाजी तरी असता काय ? तेव्हा विचाराला विचाराने उत्तर द्यावयास शिकू या आणि शिवाजीचे नुसते नाव घेण्याऐवजी शिवाजीसारखे दुसरे महापुरुष निर्माण करण्याचा प्रयत्न करू या. परंतु जेथे शिवाजीचा इतिहास केवळ परीक्षेसाठीच शिकवला जातो आणि त्या परीक्षेतही कॉपी करून उत्तरे लिहिली जातात, तेथे शिवाजीसारखे महापुरुष कसे निर्माण होतील, हा प्रश्न माझ्यापुढे येतो.
उजाडले, पण सूर्य कोठे आहे?
एका विशिष्ट जातीने शिक्षणाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवली होती, बहुजन समाजाला हजारो वर्षे शिक्षणाची दारे खुली नव्हती इत्यादी प्रकारच्या तक्रारी एके काळी केल्या जात होत्या. या तक्रारींमागच्या ऐतिहासिक सत्याचे विवेचन करण्याचे हे स्थळ नव्हे. एके काळी बहुजन समाजाला शिक्षणासाठी खूप झगडावे लागले, हे खरे आहे. परंतु आज मात्र कोणीही कोणाचीही शिक्षणाची दारे बंद केलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता ज्ञानाचे दरवाजे सर्व बाजूंनी खुले झाले आहेत. परंतु आता तरी बहुजन समाजाला ज्ञान मिळते आहे काय? एकाच उदाहरणावरून या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट होऊ शकेल. महाविद्यालयाचे दोन वर्षांचे शिक्षण घेतलेला माझाच एक नातेवाईक नोकरीसाठी मुलाखतीला निघालेला आहे. ही नोकरी निश्चितच मिळणार, असे तो आत्मविश्वासपूर्वक सांगतो. कारण कोणा एका आमदाराने त्याच्यासाठी एक चिठ्ठी दिलेली आहे. दिलेली चिट्ठी बंद पाकिटात घालून दिलेली नसल्यामुळे कुतूहल म्हणून मी ती चिठ्ठी वाचतो. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीचा आशय पुढीलप्रमाणे आहे- ‘ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्या माणसाची व माझी फक्त तोंडओळखच आहे. त्याने आग्रह धरल्यामुळे नाइलाजाने मी ही चिठ्ठी देत आहे. तेव्हा तू ही चिठ्ठी विचारात घेण्याचे कारण नाही.’
“तू ही चिठ्ठी वाचली आहेस का,” असा प्रश्न मी विचारल्यावर तो मुलगा ‘होय’ म्हणून उत्तर देतो. त्याला चिठ्ठीचा अर्थ कळलेला नाही, हे स्पष्ट आहे. खुलासेवार विचारल्यानंतर आपण इंग्रजी या विषयात पास होण्यासाठी दरवषीं काय काय केले, ते तो तपशीलवार सांगतो. पास होण्याचे हे प्रकार हल्ली जगजाहीर झालेले असल्यामुळे मी येथे त्यांचा निर्देश करीत नाही. हे उदाहरण अगदी प्रातिनिधिक आहे, असे नव्हे. परंतु बहुजन समाजातील किती
तरी विद्यार्थ्यांना ते लागू पडेल, यात मुळीच संशय नाही. या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची दारे कोणी बंद ठेवली आहेत काय? आपल्या कर्तृत्वहीनतेचे खापर त्यांना अजूनही दुसऱ्याच कोणाच्या माथी फोडावयाचे आहे काय? आणि ते तसे फोडल्यामुळे त्यांचा काही फायदा होणार आहे काय? वस्तुस्थिती अशी आहे की, शिक्षण स्वस्त व विपुल होऊनही बहुजन समाजाला ज्ञान मात्र मिळालेले नाही. ‘उजाडले, पण सूर्य कोठे आहे?’ आणि ‘शिकलो, पण ज्ञान कोठे आहे?’ अशीच या बाबतीत त्याची स्थिती आहे. आता कोणी असे म्हणतील की, शिक्षणाचा विस्तार होताना गुणवत्तेकडे थोडेसे दुर्लक्ष होणारच. काही अंशी हे खरेही आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वतः मलाही हा विचार मान्य आहे. परंतु एक तर विस्ताराचे हे काम पूर्ण व्हावयास कदाचित शेकडो वर्षेही लागतील. आतापर्यंत झालेला विस्तार कोणाला मोठा वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो आवश्यकतेच्या मानाने फारच कमी आहे; कारण मराठ्यांच्या हजारो कुटुंबांपर्यंत अजूनही शिक्षण पोहोचलेलेच नाही. तेव्हा विस्तार पूर्ण झाल्यानंतर आम्ही गुणवत्तेकडे लक्ष देऊ, असे कोणी म्हणत असतील; तर त्यांना बहुधा गुणवत्तेकडे लक्ष देण्याची संधीच मिळणार नाही. दुसरे असे की, गुणवत्तेची थोडीशी उपेक्षा करणे वेगळे आणि गुणवत्ता नामशेष करून टाकणे वेगळे. दूध तापवताना त्यात थोडेसे पाणी मिसळणे वेगळे आणि दुधाचे पाणीच करून टाकणे वेगळे. आज आमच्याकडे विद्यापीठे आहेत आणि शिक्षणसंस्थाही आहेत. शिक्षण आहे आणि पदव्याही आहेत, पण ज्ञान कोठे आहे? ज्ञान ही मानवी जीवनातील एक महान शक्ती आहे, संपत्ती आहे, हे आम्हांला कळते आहे काय? ज्ञानप्राप्तीसाठी खडतर तपश्चर्या आवश्यक असते, कष्ट घेण्याची तयारी असावी लागते. परंतु आम्हांला तपश्चर्या नको, कष्ट नकोत; फक्त ‘शॉर्टकट्स’ हवेत. सहजासहजी पदवी हवी; पण ज्ञानच नसेल, तर पदवीचा काय उपयोग?
शिवाजीचा पुतळा नको, उत्तम शिक्षक हवा!
माझ्या पूर्वजाला शिक्षण नव्हते म्हणून तो अज्ञानी होता. मला शिक्षण मिळाले आहे आणि तरीही मी अज्ञानीच आहे म्हणजे माझी प्रगती झालेली नाही. उलट माझ्या अडाणी पूर्वजांकडे नसलेला सुशिक्षितपणाचा, ढोंगीपणाचा व आत्मवंचनेचा एक मुखवटा मात्र माझ्याकडे आहे. पदव्या घेतलेल्या मुलांना स्वतःचा म्हणून एखादा विचार मांडण्याची पात्रता नाही. त्यांना दोन वाक्ये सुसूत्रपणे लिहिता व बोलताही येत नाहीत, अशी स्थिती आढळते. हे असे का झाले आहे, याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. हजारो वर्षे ज्ञानाच्या अभावी कुजत पडल्याची
खरोखरच खंत वाटत असेल, तर आज ज्ञानाची दारे पूर्णपणे उघडल्यानंतर आपण खराजनाचा ध्यास घेतला पाहिजे. शिक्षणाचा केवळ रतीब घातल्यामुळे ही ज्ञानप्राप्ती होणार नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे.आपल्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षक नेमले जावेत आणि नेमलेल्या शिक्षकांचा दर्जा वाढावा म्हणून आकाशपाताळ एक केले पाहिजे. शिकवण्याऐवजी परीक्षेत कॉपी करण्याम मदत करणारा शिक्षक आपली भयानक फसवणूक करीत आहे, हे विद्यार्थ्यांनी ओळखले पाहिजे. गावात शिवाजीचा पुतळा उभारण्याऐवजी त्याच खर्चात त्या गावाला एक अत्यंत दर्जेदार शिक्षक दिला, तर तो शंभर नव्या शिवाजींची जडणघडण करील, हे आम्हांला केव्हा कळणार आहे? राजकीय पुढाऱ्यांची थुंकी झेलणाऱ्या लाचार शिक्षकांचे विद्यार्थी शिवाजीसारखे शूर होत नसतात ! ज्या देशात शिक्षक लोक लाचार आहेत आणि लाचार लोक शिक्षक आहेत, त्या देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे कशाच्या आधारे म्हणावे, हेच कळत नाही.
ज्ञानसाधना नाही
कडाडून भूक लागली म्हणजे अन्न खाण्यासाठी किंवा खूप तहान लागली म्हणजे पाणी पिण्यासाठी आपण जसे तडफडतो, तसे ज्ञान मिळवण्यासाठी आपण तडफडतो काय, याचे उत्तर मराठ्यांनीच द्यावे. मोठमोठ्या पदव्या मिळवलेली बहुजन समाजातील मुले ग्रंथ वाचताना स्वतःच्या मेंदूचा, स्वतःच्या विचारशक्तीचा उपयोगच करीत नाहीत, हे पाहून मन विषण्ण होते. अशा तरुणांमधून साहित्यिक वा विचारवंत, वैज्ञानिक वा तत्त्ववेत्ते किंवा जगाला नवी दिशा देणारे असे कोणी महापुरुष कसे निर्माण होतील? स्वतः निष्क्रिय अवस्थेत अंधारात बसून पडद्यावर चाललेली दुसऱ्या कोणाची तरी पराक्रमाची कृत्ये पेंगत-पेंगत पाहणाऱ्या प्रेक्षकांसारखी मराठ्यांची स्थिती आहे. कविता वा कथा दुसऱ्यांनी लिहाव्यात आणि यांनी त्या जमल्यास फक्त वाचाव्यात. किंबहुना अवघी संस्कृती इतर कोणी तरी निर्माण करावी आणि यांना त्याचा किमान योग्य पद्धतीने आस्वादही घेता येऊ नये, अशी केविलवाणी स्थिती आहे. शेती, मजुरी इत्यादी व्यवसाय करणारे मराठे कष्टाची तमा न बाळगता अखंडपणे राबत असतात. परंतु दूरदृष्टी, समयसूचकता, बुद्धिमत्ता इत्यादींच्या अभावामुळे इतके राबूनही त्यांना त्याचे फळ मिळत नाही. याचे कारण मराठा जातीला बौद्धिक परिश्रम करण्याची सवयच नाही. त्यामुळेच रात्रीचा दिवस करून काबाडकष्ट करणाऱ्या लोकांची मुले शिक्षणासाठी शहरात येतात, परंतु कष्टपूर्वक अध्ययन करीत नाहीत. आपले आई-वडील जितके राबत असतात, त्याच्या एक दशांश कष्ट जरी या मुलांनी घेतले, तरी त्यांची जीवने उजळून निघतील; परंतु बौद्धिक परिश्रमांना सामोरे जाण्याची त्यांची तयारीच नाही. दिवसातून अठरा अठरा तास ऊन-वाऱ्याची पर्वा न करता नांगर, कुदळ, फावडे हातांत घेऊन रावणाऱ्या माणसांची मुले ग्रंथालयात सावलीला बसून एकाग्रतेने दोन तास पुस्तक वाचू शकत नाहीत, ही दारुण शोकांतिका आहे. हीच मुले जर शिकण्यासाठी शहरात आली नसती, तर त्यांनीही आपल्या वडलांप्रमाणेच उन्हातान्हात अठरा अठरा तास काम केले असते. आपल्याला शारीरिक कष्टाची सवय आहे, तशीच आपण बौद्धिक परिश्रमांची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
१९४७ साली भारताची एकच फाळणी झाली. परंतु मराठ्यांच्या जवळजवळ प्रत्येक घरात प्रत्येक पिढीला एक हृदयविदारक फाळणी होत असते. (राजकीय पक्षांच्या आधारे प्रत्येक खेड्याचीही फाळणी झालेली आहे.) ‘भावाला भाऊ वैरी’ ही म्हण घराघरांतून सार्थ केली जात आहे. तसे पाहता मुलांनी वडलार्जित संपत्तीची वाटणी करून घेण्यात वावगे असे काही नाही. परंतु विचारपूर्वक व सामंजस्याने वाटणी करून घेतल्याची उदाहरणे मराठा जातीमध्ये क्वचितच आढळतात. पाच रुपयांच्या वस्तूंची वाटणी करताना हमरीतुमरीवर यावयाचे, मारामाऱ्या करावयाच्या आणि पाचशे रुपयांचे नुकसान करून घ्यावयाचे, हे सर्वत्र चालू आहे. म्हणूनच आपल्या मुलांसाठी इस्टेट किती ठेवली, याचा हिशेब मांडण्यापेक्षा त्यांच्यासाठी संस्कार, विचारशक्ती, स्वावलंबन इत्यादींचा वारसा किती ठेवला, याचा हिशेब मांडला, तर त्या मुलांच्याच अधिक हिताचे ठरणार आहे.
उदात्त संघर्षाचा अभाव
स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्याची एक चमत्कारिक ईर्ष्या मराठ्यांमध्ये आढळते. माझे कितीही नुकसान झाले, तरी बेहत्तर; परंतु त्याला हिसका दाखवल्याखेरीज राहणार नाही, असे इरेला पडलेले लोक घराघरांतून आढळतात. जमीन हा तर मराठ्यांचा एक विचित्र मानबिंदू बनलेला आहे. फूटभर बांधासाठी मारामारी करावयाची, खून पाडावयाचे आणि स्वतः ही शिक्षा भोगावयाची, हे गावोगाव चालले आहे. बांध रेटून कोणी दुसऱ्यापेक्षा अधिक श्रीमंत झाल्याचे एकही उदाहरण नाही. कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची मात्र अनंत उदाहरणे आहेत आणि तरीही बांधावरून व अशाच क्षुल्लक कारणांवरून मारामाऱ्या करणे कोठेही थांबलेले नाही. स्वतःच्या हिताचा व फायद्याचा विचार करण्याइतकीही अक्कल आपल्याला आलेली नाही. विचार व विवेक यांच्या पातळीवरची परिपक्वता आपल्याला अजून आलेलीच नाही. अशा प्रकारच्या कुटुंबांतून चाललेला संघर्ष हा वांझोटा व विध्वंसक असा संघर्ष आहे. असा संघर्ष आपण विपुल प्रमाणात करीत असतो; कारण अरेरावी, उर्मटपणा, अशिष्टता, अविचार इत्यादी दुर्गुण आपल्या ठिकाणी भरपूर आहेत. अज्ञानादी दोषांच्या विरोधात उभे राहून विधायक व निर्मितिक्षम संघर्ष करण्याची मात्र आपली तयारी नाही. आणि यातच आपल्या मागासलेपणाची बीजे आहेत.
जिजुनाट रूढी, अंधश्रद्धा इत्यादींच्या नाशासाठी केला जाणारा संघर्ष हा खराखुरा संघर्ष असतो. नव्या सांस्कृतिक मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी केला जाणारा संघर्ष हा आदर्श संघर्ष असतो. एक नवी समाजरचना घडवून आणण्यासाठी आपलो विधायक प्रतिभा आणि कर्तृत्व यांच्या साहाय्याने आज आपण असाच एक महान संघर्ष करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतून आपण दर्जेदार अशा असंख्य संस्थांची उभारणी केली पाहिजे. साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रकाशन, व्याख्याने, वाचनालये, क्रीडा, अपंगांना साहाय्य, स्त्रीमुक्ती, बालशिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रांतून आज महाराष्ट्रात ज्या दर्जेदार संस्था आहेत, त्यात मराठे अपवादानेच आढळतात. कलह व संघर्षप्रिय असलेल्या मराठ्यांनी एक आव्हान म्हणून अशा संस्थांच्या उभारणीला वाहून घ्यावे. तेथे त्यांना एक उमदा आणि उदात्त संघर्ष करण्याची संधी मिळेल. अशा संघर्षातून मिळणाऱ्या आनंदाची चव चाखल्यानंतर हेव्यादाव्यांतून केला जाणारा संघर्ष किती घृणास्पद असतो, याची त्यांना जाणीव होईल. मग द्वेष, मत्सर, शिवीगाळी, आडदांडपणा, उर्मटपणा, मारामारी, खूनबाजी इत्यादी प्रकारच्या संघर्षाला मूठमाती द्यावी, असे त्यांना वाटेल. त्यांच्या या नव्या संघर्षामुळे संपूर्ण समाजाला विकासाची नवी परिमाणे लाभतील.
स्त्रियांचा छळ चालूच…
‘पायातील वहाण पायीच बरी,’ ही स्त्रीविषयीची धारणा मराठा पुरुषांनी अजूनही फारशी बदललेली नाही. मराठा स्त्रीच्या दृष्टीने अजूनही घर हा कोंडवाडाच आहे. तिला आजवर खऱ्या अर्थाने कोणी साहित्यातही बोलके केलेले नाही. नव्या पिढीने तिला बोलके केले, तर युगानुयुगे तिच्या अंतःकरणात साठून राहिलेले कढ, किंबहुना ज्वालामुखीच उफाळून बाहेर येतील! मराठा पुरुषांच्या परपीडनप्रवृत्तीला केवळ दलित लोकच बळी पडतात, असे नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील स्त्रिया, मुले, भावंडे व शेजारीही बळी पडत असतात. अजूनही स्त्रियांच्या बाबतीत कमालीचा पक्षपातीपणा केला जातो. शिक्षणाच्या बाबतीत त्यांना दुय्यम लेखले जाते. दारामध्ये गायी, म्हशी झुलत असल्या, तरी सुनेला दुधाचा थेंब न देणारी कुटुंबे माझ्या पाहण्यात आहेत. स्वतःला सुशिक्षित व पुरोगामी गामी समजणारे लोकही मुलाचे बारसे साजरे करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात; परंतु मुलगी झाली की, कपाळाला आठ्या घालतात, हे मी बघितले आहे.
लग्न झाल्यावर चारसहा महिन्यांतच स्वतःला जाळून घेणाऱ्या वा जाळल्या जाणाऱ्या, विहिरीत उडी घेणाऱ्या वा ढकलल्या जाणाऱ्या आणि माहेरी पळून जाणाऱ्या वा हाकलल्या जाणाऱ्या स्त्रियांची संख्या मराठा जातीमध्ये जितकी आहे, तितकी बहुधा दुसऱ्या कोणत्याही जातीमध्ये नसेल. स्वतःच्या अंगी कसलेही कर्तृत्व व पुरुषार्थ नसलेली माणसेही आपल्या बायकोने माहेरून वेगवेगळ्या वस्तू आणाव्यात म्हणून तिचा अखंड छळ करीत असतात. लग्नाच्या वेळी केल्या जाणाऱ्या खर्चानंतर पुन्हा एकदा वर्षादोन वर्षांनी माहेरून ‘करणी करून येणे’ असा एक प्रकार असतो. त्यावेळी कॉट, गादी इ. पासून ते घरी लागणाऱ्या वेगवेगळ्या भांड्यांपर्यंत अनेक वस्तू मुलीने आपल्याबरोबर आणावयाच्या असतात. ऐपतीचा विचार करण्याऐवजी गावातील इतर सासुरवाशीण मुलींनी आणलेल्या ‘करणी’बरोबर उगाचच तुलना केली जाते आणि काही तरी निमित्त करून स्त्रियांचा छळ चालू ठेवला जातो.
एकदा एक स्त्री प्रसूत झाल्यानंतर तिच्या स्तनांमध्ये पू झाला, परंतु तिला औषध आणण्याऐवजी मुलाचे बारसे साजरे करण्याची जय्यत तयारी करण्यात आली. या बारशासाठी आलेल्या सासरच्या लोकांचा मानपान करताना काही उणीव राहिली म्हणून भांडणे झाली. या वातावरणात त्या स्त्रीच्या आरोग्याचे काय झाले असेल, याचा कोणी विचारही केला नाही. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे, याचा अल्पसा विवेकही अजून आलेला नाही, याचेच हे लक्षण होय. आता बहुसंख्य जातींनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिलेली आहे. मराठा स्त्रीला मात्र अजूनही हा हक्क मिळालेला नाही. या वृत्तीमागे खानदानाविषयीच्या भ्रामक कल्पना आहेत. विधवांचे जीवन सर्व प्रकारे उद्ध्वस्त केले जाते. वारसाहक्कापासून त्यांना वंचित करण्यासाठी सर्व खटपटी-लटपटी केल्या जातात. गावगुंड त्यांची विटंबना करतात. कष्ट करूनही त्यांना लाचारीचे जिणे जगावे लागते. स्वतःचे घर नव्याने उभारण्याची परवानगी मात्र त्यांना दिली जात नाही.
जोपर्यंत मराठा स्त्री असाहाय्य अवस्थेत अशी खितपत पडलेली आहे, तोपर्यंत मराठा समाज खऱ्या अर्थाने आधुनिक युगात प्रवेश करूच शकणार नाही. म्हणूनच आपणही एक स्वतंत्र माणूस आहोत आणि स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा आपणास अधिकार आहे, याची जाणीव देणारे आधुनिक व विज्ञाननिष्ठ शिक्षण मराठा स्त्रीला देणे ही आजची अत्यंत निकडीची गरज आहे. आधुनिक मूल्ये आत्मसात करावयास समर्थ बनवणारे शिक्षण मराठा स्त्रीला मिळाले, तर मराठा समाजाला बुरसटलेल्या विश्वात जखडून टाकणारे सरंजामशाहीचे पाश तटातट तुटल्याखेरीज राहणार नाहीत. म्हणूनच आपल्या भावी पिढ्यांनी सर्वांगीण विकासाच्या दिशेने मोठी झेप घ्यावी, असे मराठ्यांना वाटत असेल (असे वाटणे हीदेखील एक फार मोठी झेप ठरेल!), तर त्यांनी मराठा स्त्रीची सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्तता केलीच पाहिजे.
नकोशी अरेरावी
आपली संख्या गावामध्ये अधिक असल्यामुळे इतर जातीच्या लोकांशी अন্টান नागणे हाही मराठ्यांचा एक अंगभूत गुणधर्म बनला आहे. वस्तुतः आपल्यात समाजाने नेतृत्व आलेले असेल, तर आपण वडीलधारेषणा पत्करून मनांच समाजात सर्वसमावेशक विचार करावयास हवा. आपण ३५ टक्के असू आणि उन्ना जाती ५ टक्के, ७ टक्के वा १३ टक्के असतील, परंतु त्या सर्वाच्या पाठबळावरच आपण उभे आहोत, हे आपण विसरता कामा नये. आजपर्यंत इत्तरांनी आपली अरेरावी सहन केली असेल, येथून पुढे ती सहन केली जाणार नाही आणि केली जाऊही नये ! पाच-सात टक्के असलेले सर्व लोक एकत्र येऊन ६५ टक्के झाले तर एरव्ही बहुसंख्य वाटणारे ३५ टक्के मराठेही अल्पसंख्य होतील, हे कोणी विसरू नये, तसे होण्याची शक्यता आहे. याची चाहूल आता लागलेली आहे. तेव्हा अजून तरी आपल्या मराठेपणाची धार इतरांना बोचणार नाही, याची आपण खबरदारी घेतली पाहिजे.
ध्येयहीन गर्दी
महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्याही एका जातीपेक्षा मराठ्यांची संख्या अधिक असल्याचा निर्देश मी केला. परंतु या सर्व मराठ्यांचा मिळून एकजिनसी व एकात्म असा समाज मात्र निर्माण झालेला नाही. या समाजाला आडवे उभे असे परस्परविरोधी हितसंबंधांचे अनेक छेद गेलेले आहेत. किंबहुना मी तर असे म्हणतो की, हा मुळी समाजच नाही. कसलीही शिस्त नसलेली व कसलेही रंगरूप नसलेली अशी ही एक गर्दी आहे. एक जमाव आहे. विशिष्ट तत्त्वांच्या आधारे एकमेकांवर अवलंबून असलेला व परस्परांच्या सहकार्याने प्रगती करणारा असा लोकसमूह समाज या संज्ञेला पात्र ठरतो. गर्दीतील लोकांची ध्येये वेगळी असतात, दिशा वेगळ्या असतात, हितसंबंध वेगळे असतात. तशीच स्थिती मराठ्यांची आहे. या गर्दीमध्ये शोषक आणि शोषित एकत्र आहेत. एकीकडे राजे-संस्थानिक व पाटील-देशमुख आहेत; तर दुसरीकडे कुणबी आहेत, मजूर-हमाल आहेत. एकीकडे पंच-सप्त कुळीचे वा शहाण्णव कुळीचे लोक आहेत; तर दुसरीकडे कडू, अक्करमासे इत्यादी आहेत. एकीकडे कमालीची सुरक्षितता वाटत असल्यामुळे बेजबाबदार, बेफिकीर व मुजोर झालेले लोक आहेत; तर दुसरीकडे निराधार, निराश व वैफल्यग्रस्त लोक आहेत. या सर्वांना मराठा या एकाच नावाचे फक्त आवरण आहे, बुरखा आहे. स्वतःच्या जातीतील हे अंतर्गत भेद ज्यांना दूर करता येत नाहीत, ते संपूर्ण जातिभेदाचे उच्चाटन करण्यासाठी कंबर कसून पुढे येतील, ही शक्यताच नाही. या लोकांनी सध्या एवढेच ध्यानात घ्यावे की, जोपर्यंत आपण हे भेद दूर करून सर्व माणसांना समान मानत नाही, तोपर्यंत दुसऱ्या कोणी जपलेल्या चातुर्वर्थ्यावर टीका करण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. आपण स्वतःला क्षत्रिय म्हणवून मिरवावयाचे आणि कोणी आपल्या ब्राह्मण्याचा गर्व बाळगला, तर चिडावयाचे, हा दुटप्पीपणा झाला.
तरुणांना आवाहन
या विश्लेषणाचा समारोप करताना मराठा तरुणांना एक आवाहन करावे, असे मला पुनःपुन्हा वाटते. समाजाची अशी किती तरी क्षेत्रे आहेत की, जी आर्त स्वराने तरुणांना पुकारत आहेत, साद घालीत आहेत, आवाहन करीत आहेत वा आव्हान देत आहेत. मराठा तरुणांनी अशा विविध क्षेत्रांतून स्वतःला झोकून द्यावे, असे मला वाटते. ते यशस्वी होवोत वा न होवोत, त्यांची धडपड व इच्छा मात्र दिसली पाहिजे. धडपडणाऱ्या माणसांचे अपयशदेखील यशस्वीच असते, याची साक्ष देण्यासाठी मानवजातीचा अवघा इतिहास उभा आहे.
या वेगवेगळ्या क्षेत्रांतून चमकण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमत्ता व कर्तबगारी मराठा तरुणांकडे नाही, असे नाही. बुद्धिमत्तेसारख्या गोष्टी सर्व जातीतील लोकांकडे असू शकतात. मराठा जातीतील तरुणांकडे अशा किती तरी अंतःशक्ती आहेत. परंतु त्यांना त्यांची जाणीवच नाही. आपली अंतःशक्ती ओळखणे म्हणजे जीवनातील अर्धे यश प्राप्त करण्यासारखे असते. परंतु मराठा तरुणांच्या अंतःशक्ती तर गंजत पडल्या आहेत. ‘हे आपले काम नव्हे, हे आपल्याला जमणार नाही,’ हे त्यांनी गृहीतच धरलेले असते. सुप्त शक्तीचे एक प्रचंड भांडार अंतर्यामी असूनही विविध क्षेत्रांतील या समाजाची कर्तबगारी तुलनात्मकदृष्ट्या नगण्य आहे. थोड्याशा जाणीवपूर्वक प्रयत्नांनी या अंतःशक्तींना अनंत धुमारे फुटू शकतील, असा मला विश्वास आहे. तेजस्वी, ध्येयनिष्ठ व समर्पणाला सिद्ध असलेले फक्त १०० युवक चिकाटीने व जिद्दीने उभे राहिले, तर ते आपल्या समाजाला अंतर्बाह्य ढवळून काढू शकतील व मग हा समाज कात टाकून एका नव्या चैतन्याने सळसळू लागेल.
शेवटी मराठा तरुणांचे आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधावे, असे मला वाटते. काळाच्या पुढे जाणारांचा निःसंशयपणे विजय होतो. काळाच्या बरोबर जाणारांचा निदान पराभव होऊ शकत नाही. काळाच्या मागे राहणारांना मात्र इतरांच्या मागून केवळ फरफटत जावे लागते आणि त्यांचा केवळ पराभवच नव्हे, तर नाशही होण्याचा धोका संभवतो. इकडे ज्याच्याशी स्पर्धा करावयाची, त्या काळाची गती तर इतकी प्रचंड आहे की, आपण सध्या जेथे आहोत, तेथेच टिकून राहण्यासाठीदेखील आपल्याला खूप वेगाने पळण्याची आवश्यकता आहे. आणि… आणि आपण तर चक्क झोपलोच आहोत!



