सामाजिक

हैद्राबादची निजामशाही

१७ सप्टेंबर मुक्ती संग्राम लढा दिनाचा आढावा

१७ सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी या ठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. १७२४ ते १९४८ अशी सलग २२४ वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता २०० वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे.

निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. १७२४ ला मोगलांचा सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. १७६७ नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्‍या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो.
१५ ऑगस्ट १९४७ म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास ५६५ संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. १९४८ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. १९४१ च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ ८२ हजार ६९४ चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण १६ जिल्ह्याचा समावेश होता.
२२हजार ३६० खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या १ कोटी, ६३ लाख,३८ हजार,५३४ एवढी होती. त्यात ८५ % हिंदू तर १२%मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त १०% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या ५२ लाख १९ हजार ५४८होती. एकूण क्षेत्रफळाच्या ४२ % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती. अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी १५ कोटीचे उत्पन्न मिळत होते.
हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, १८८३ पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे २१ विभाग काढून त्याद्वारे गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे १९१०पर्यंत निजामाकडे जमा होणारा महसूल हा २ कोटी ८९ लाख ४३ हजार इतका होता. अगदी २ आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन १.३९ ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात २६ आण्याचा १ रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महेबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते.
१९१० पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्‍याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील ५६५ संस्थानात २१ तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता.
१८०० साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबाद जवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून १८७० साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून १९०५ साली पडलेल्या दुष्काळात निजामाने २८००० रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली.
१९११ ते १९४८ ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या १० श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय १९२१ सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात
नापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हिच मागणी माझी ईश्वराला.”
राज्यकर्ते मुस्लिम असले तरी गाव पातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निपक्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्‍या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. १९४६ पर्यन्त सारकाही व्यवस्थित चालू होतं.
मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. १९४६ ते १९४८ अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एक्या अद्भूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची १८ महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे १९४७-४८ चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे शिकले त्यांचा इतिहास पुस्तकात आला परंतु अनेक अशी मंडळी आहे त्यांना अजूनही इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची १५-२० माणसं रझाकारांनी कापून काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही. म्हणूनच उस्मानाबाद आकाशवाणीच्यावतीने “ हैद्राबाद मुक्तिसंग्रामात, असे झुंजलो आम्ही ” नावाची मालिका सादर करून दुर्लक्षित इतिहास आपल्या समोर मांडला जाईल. अशा या दुर्लक्षित वीरांना समाजासमोर मांडणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

प्रा. डॉ. सतीश कदम, उस्मानाबाद, ९४२२६५००४४

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button